अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने कणखर नेतृत्व गमावले; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची भावपूर्ण श्रद्धांजली

जानेवारी 28, 2026 5:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२६ । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

gulabrao patil ajit pawar

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात की,अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. वक्तशीरपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची मजबूत पकड यासाठी ते ओळखले जात होते. सभागृहातील शिस्तबद्ध वर्तन, सर्वसामान्यांबद्दलची आपुलकी आणि राज्याच्या विकासासाठी असलेली तळमळ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता.

Advertisements

विरोधकांनाही आदराने वागवणारे अशी ओळख असलेले अजितदादा हे बारामतीचे किल्लेदार म्हणून केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत होते. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असेही पाटील यांनी नमूद केले.

Advertisements

या दुःखद घटनेमुळे पवार कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो तसेच पवार कुटुंबीयांना आणि त्यांच्या असंख्य समर्थकांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now