शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या आमदारास गुलाबराव पाटलांचे आव्हान, म्हणाले…
जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । वेळ आली तर ते देखील करू असं म्हणत शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणारे आमदार प्रसाद लाड यांना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट आव्हान दिलं आहे. ‘प्रसाद लाड हे शिवसेना भवन फोडण्याची गोष्ट करताहेत. माझं त्यांना आव्हान आहे, जरा तारीख कळवा. आम्ही तुमचं काय फोडू हे कळेल,’ असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
राज्यात सत्तांतर होईल अशी अपेक्षा ह्या लोकांना आतापर्यंत होती. पण ते होत नाही हे समजल्यावर काहीतरी करून वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्या गोष्टी माहीत असलेल्या लाड यांच्यासारख्या मोठ्या व्यापाऱ्याच्या मुखातून हे शोभत नाही. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी हा प्रयोग करून बघावा,’ असं आव्हानच पाटील यांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
भाजपच्या माहीम येथील कार्यालयाबाहेर शनिवारी पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. राणे कुटुंबीयांना मानणारे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळं भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. त्यामुळं ते (शिवसैनिक) घाबरून गेले आहेत. आम्ही नुसते माहीममध्ये आलो तरी भाजपवाले शिवसेना भवन फोडायला आले आहेत की काय, असंच त्यांना वाटतं. पण घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,’ असं लाड यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, हे प्रकरण चिघळल्याचं लक्षात येताच प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे. ‘मी असं बोललोच नव्हतो. मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे,’ असं लाड यांनी म्हटलं आहे.