जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील जनतेचं लक्ष आज होणाऱ्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे राहणार. कारण मागील काही दिवसापासून राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापले आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यात कोण काय बोलणार याची उत्सुकता लागून आहे. दरम्यान, त्यापूर्वी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी थेट आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.
आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरावा की वापरू नये हे आम्हाला बोलण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. आदित्य ठाकरे यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही जेव्हा राजकारण सुरू केलं. तेव्हा आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नसेल. त्यांनी सांभाळून बोलावं. नाही तर आम्ही तोंड उघडलं तर पळावं लागेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
तसेच पुढे तुम्हाला शिवसैनिक आणण्याचं टार्गेट दिलं आहे का? असा सवाल केला असता गुलाबराव पाटील म्हणाले आम्हाला कोणतंही टार्गेट नाही. आमचं टार्गेट शिवसैनिक आहे. तो न बोलविता येत असतो. आता कुणी पायी तर येणार नाही. वाहनांची व्यवस्था तर करावीच लागेल. आम्ही 1966 साली जेव्हा यायचो. तेव्हा फक्त छातीला बिल्ला असायचा. शिवसेना जिंदाबादच्या घोषणा असायच्या. रेल्वेतून यायचो. आता काळ बदलला आहे. जसा काळ बदलतो, तसं बदलावं लागतं, असं ते म्हणाले.
गुलाबराव पाटलांच्या संकल्पनेतून मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत
तसेच पुढे शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत तयार करण्यात आले आहे. आज हे गीत सर्वासाठी रिलिज करण्यात आले. “हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे, असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.