जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीसाठी अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ट्रम्प यांना मध्यस्थीचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. दरम्यान त्यांच्या विधानावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बोचरी टीका केली

नेमकं काय म्हणाले मंत्री पाटील?
बेलाज, बेशरम जो माणूस असतो ना…तो या प्रकारच्या गोष्टी करत असतो. ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर विचारणारे तुम्ही कोण आले. तुम्ही तुमची मध्यस्थी मातोश्रीवर करा. इकडे मध्यस्थी करू नका, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
तसेच पाकिस्तानने केलेल्या शस्त्र संधीच्या उल्लंघनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं, या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. ते म्हणाले, आपण कोण बोलत आहोत. कोणावर बोलत आहोत. तुम्ही साधे नगरसेवक तरी झाला आहात का? आमदारांच्या मतावर तुम्ही खासदार झालात आहात. आज काय परिस्थिती आहे. देशाच्या बाजूने उभे राहण्याची आज वेळ आहे. परंतु आपल्याच घरातील लोक पंतप्रधान यांच्यावर टीका करत असतील तर देशाची परिस्थिती काय होईल?.त्याचा विचार राऊत यांनी करावा, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी त्यांना दिला.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटील म्हणाले, राजकारणात काही होऊ शकते. निवडणुका आटोपल्या की लोक दहा दिवसात पक्षांतर करत आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आश्चार्य वाटू नये, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.