जळगाव जिल्हा

नशिराबाद येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार, पालकमंत्र्यांची मोठी घोषणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद हे मोठ्या लोकवस्तीचे शहर असून वाढीव लोकसंख्येची गरज आणि महामार्गाला लागून असल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केली. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले की, नशिराबादच्या विकासासाठी आपण भरीव निधी दिला असून यातील दोन कोटीच्या रस्त्यांची कामे आणि नगरपंचायतीच्या इमारतीच्या कामांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे.

विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव न करता नशिराबाद वासियांना सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द असून येत्या काळात नशिराबादचा कायापालट झालेले आपल्यास दिसेल अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली. तर प्राथमिक आरोग्यउप केंद्र हे रूग्णसेवा केंद्र बनावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

नशिराबाद येथील गरज लक्षात घेऊन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी मागणी स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी व जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती.

यावर ना.गुलाबराव पाटील यांनी तातडीने यासाठी उपलब्ध असणार्‍या जागेची पाहणी करून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तब्बल साडेचार कोटी रूपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिला असून याचे काम सुरू झालेले आहे. यासोबत नशिराबादकरांची गरज लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी दीड कोटी रूपयांचा निधी देऊन आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण केले. याच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जामनेर च्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी मोहन साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, नशिराबाद वैद्यकीय अधिकारी ईरेश पाटील माजी सरपंच विकास पाटील माजी उपसरपंच किर्तिकांत चौबे, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बर्‍हाटे, तत्कालीन सरपंच विकास पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, चंद्रकांत भोळे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, शोएब पटेल, माजी शिक्षण व आरोग्य सभापती कमलाकर रोटे, वैशाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

जि प चे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून शहराच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्याभरीव सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानून शहरात अजून आवश्यक असणार्‍या कामांची मागणी केली.

गुलाबभाऊ म्हणजे काम करणारे पालकमंत्री!

जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कामाचे आणि सहकार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, आम्हाल आजवर कधीही निधीची अडचण आली नाही. भाऊंनी निधी प्रदान करतांना कधीही पक्षीय भेद मानला नाही. यामुळे कामांना गती आलेली आहे. यामुळे खर्‍या अर्थाने काम करणारे पालकमंत्री म्हणजेच गुलाबभाऊ असल्याचे तोंड भरून कौतुक त्यांनी केले. तर जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी देखील भाऊंच्या कौतुक केले.

पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून विकासासाठी सर्वांनी एकत्र असावे असे आवाहन केले. ते म्हणाले की, नशिराबाद हे शहर हायवेला टच असून आता मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. यामुळे येथे वैद्यकीय सुविधा देखील वाढीव अशी लागणार असल्याने येथे भविष्यात उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येथील. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना काळात केलेल्या कामगिरीचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. तर नशिराबादच्या विकासासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही देखील दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनवणे यांनी केले.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button