⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

अजित पवार आमच्या सोबत आले अन्.. नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात शिवसेनेत (Shiv Sena) बंड झाल्यानंतर ४० आमदारांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ५० खोके एकदम ओके.. असे म्हणत शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर टीका केली. अजित पवार यांनीही शिंदे गटावर खोक्यांची टीका करत होते. मात्र, अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीकडून होणारी ती टीका बंद झाली. यावरुन आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
अजित पवार आमच्या सोबत आले म्हणून खोके वाल्यांचे तोंड बंद झालेत. असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. इतकंच नाहीत आताचं तीन पक्षाचं सरकार कसं आहे याची नवी व्याख्याही गुलाबराव पाटील यांनी केली. गुलाबराव पाटील यांचा जळगावात कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी खोक्यांच्या आरोपांवरून नाव न घेता राष्ट्रवादीच्या देवकर यांच्यासह कार्यकर्त्यांना उद्देशून बोलल्याचे पाहायला मिळाले.

आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा, हेच राष्ट्रवादीवाले बोलत होते, ५० खोके एकदम ओक्के. पण, आता अजित पवार आले की ह्यांची तोंड उघडना गेली, अजित पवारांचा सत्कार करणारेही तुम्ही, शरद पवार झिंदाबाद म्हणणारेही तुम्हीच आणि विरोध करायलाही तुम्हीच. मग, तुम्ही अगोदर अजित दादांचे की शरद पवारांचे हे तरी पहिलं सिद्ध करा, असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर जोरदार निशाणा साधला.

यापूर्वी कार्यकर्त्येच नव्हे तर विरोधात असताना अजित पवार यांनीही शिंदे गटावर खोक्यांची टीका करत होते. सत्तेत गेल्यानंतर हे त्रिशुल आणि ट्रिपल इंजिनचं सरकारचा दावा नेत्यांनी केला. मात्र ‘डोकं भाजपचं, कंबर सेनेचं आणि पाय राष्ट्रवादीचे’ असं आताचं सरकार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच, हे लोकं स्टेबल नाहीत, आम्ही स्टेबल लोकं आहोत, असेही पाटील यांनी म्हटले.