जळगाव जिल्हा

नुकसानीचे आठवड्याच्या आत पंचनामे पूर्ण करा ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । केळी पिक विम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबरोबरच पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी व इतर पीक क्षेत्रांची स्थळ पाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

केळी पीक विमा प्रलंबित नुकसान भरपाई, मागील आठवड्यात झालेले नुकसान या विषयावर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी , १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे व विमा कंपनींच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

मागील आर्थिक वर्षात केळी विमा काढला होता मात्र अद्याप नुकसानी भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. विमा कंपनीने या कामात हलगर्जीपणा करू नये. शेतकऱ्यांना आठवड्याभरात नुकसान भरपाई त्यांच्या बॅंक खात्यात थेट वर्ग करावी.‌ विमा कंपनीच्या कामावर जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

तापी नदीला आलेला पूर व हतनूर बॅकवॉटरमुळे जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, बोदवड, चोपडा व जळगाव तालुक्यातील काही भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या केळी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात महसूल‌ व कृषी यंत्रणा तात्काळ सक्रीय करण्यात यावी. तलाठी व कृषी सहायकांनी मुख्यालय सोडून न जाता एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button