जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील वढोदा व घाणखेड या ग्रामपंचायतींमध्ये १५वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे विधान परिषदेत उघडकीस आला. या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला असून विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या अहवालानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक विजय अशोक भिवसने यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, सध्या कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी विजय विष्णू सातव यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली आहे.

शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री. गोरे म्हणाले, मौजे वढोदा येथील ग्रामसेवक यांची बदली झाली असून त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे सरपंचांवर नियम ३९/१ अन्वये कारवाई केली जाईल. तर, मौजे घाणखेड येथील ग्रामसेवक यांचे निलंबन करण्यात आले असून सात महिन्यांनंतर पुनर्स्थापित करण्यात आले आहे. त्यांची सुद्धा विभागीय चौकशी सुरू असून दोन्ही प्रकरणी विभागीय चौकशीचा जो अहवाल येईल, त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
घाणखेड ग्रामपंचायतीतील कामांमध्ये ७ लाख ६५ हजार ५५५ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात नमूद केले आहे.








