⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

लाच भोवली ! यावल तालुक्यात ग्रामसेवकासह ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२४ । यावल तालुक्यातून लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना चुंचाळे गावातील ग्रामसेवक आणि डीटीपी ऑपरेटरला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. हेमंत कमलाकर जोशी (रा.साकळी ता.यावल) असे ग्रामसेवकाचे नाव असून सुधाकर धुडकू कोळी (रा. चुंचाळे) असे ऑपरेटरचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
यावल तालुक्यातील चुंचाळे गावात राहणारे तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या योजनेसाठी केंद्र शासनाकडून २ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या मंजूर झालेल्या निधीतून ५० टक्के रक्कम म्हणजे १ लाख रुपयाची मागणी चुंचाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी यांनी केली होती. यामुळे तक्रारदाराने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिली.

दरम्यान विभागाने दिलेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचला. ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी सांगण्यावरून ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी यांनी १ लाख रुपयांची रक्कम घेतली. तेवढ्यात जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने ऑपरेटरला पैसे घेताना रंगेहात पकडले. दरम्यान याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात भ्रष्टाचार्यांचे धाबे दणाणले आहे.