जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । येथून जवळच असलेल्या कुसुंबा खुर्द गावात ३३ दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नसल्याने आज महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला. सुमारे शेकडो महिला एकवटल्या आणि सकाळीच ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच आणि सदस्यांना जाब विचारण्याची मागणी त्यांनी केली. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर या महिलांनी थेट ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत, पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरायला पैसे नाहीत अशी कारणे सांगितली जात आहेत. ग्रामपंचायत या अडचणींचा काहीच विचार करणार नसेल तर ग्रामस्थांनी पाण्याची आशा सोडून द्यायची का? अशी प्रश्नांची सरबत्तीच महिलांनी केली. महिलांशी बोलण्यासाठी सरपंचांचा मुलगा आला होता मात्र तोही समाधानकारक खुलासा करू न शकल्याने पुन्हा महिलांनी कडक भूमिका घेतली होती. या महिलांनी सरपंचांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आणि आमच्याकडून काहीच काम होणार नाही असे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी लिहून द्यावे, अशी मागणी या महिलांनी केल्यावर ग्रामसेवकाने केलेला शिष्टाईचा प्रयत्नही अपयशी ठरला.
थकबाकीमुळे २ दिवसापूर्वी पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी तोडली आहे. २ दिवसात थकलेल्या ९० हजार रुपये वीजबिलापैकी २० हजार बिल भरून आम्ही पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन सुरु करण्याचा प्रयत्न करू असे ग्रामसेवक शरद सूर्यवंशी यांनी सांगितले. मात्र असले तरी ३३ दिवसांपासून पाणी पुरवठा थांबवला जाण्याचे नेमके कारण काय आहे? हे स्पष्ट झाले नव्हते. ३३ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याच्या या महिलांच्या आरोपात तथ्य नाही, असेही ग्रामसेवक शरद सूर्यवंशी म्हणाले.
महिलांच्या या उत्स्फूर्त आंदोलनात शोभाबाई कोळी, वंदना राठोड, मनीषा खैरनार, अनिता पाटील, संगीता पाटील यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.