रूग्ण सेवेतून तुमचा ब्रॅण्ड निर्माण करा – डॉ. उल्हास पाटील
फिजीओथेरेपी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा जल्लोषात
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२४ । वैद्यकीय क्षेत्रातील फिजीओथेरेपीचे महत्व कोविड काळात अनेकांना जाणवले. कोरोना काळात फुफ्फुसांचा व्यायाम हा फिजीओथेरपीस्टनी शिकविला. उपचारात या व्यायामाचे महत्व फिजीओथेरेपीमुळे जगाला कळाले. म्हणूनच जागतिक आरोग्य परिषदेने त्याची दखल घेतली. पदवी प्राप्त केली असली तरी आता तुमची खरी सुरूवात आहे. वैद्यकीय सेवा सुरू करतांना रूग्ण संपर्कात सातत्य ठेवा. या रूग्णसंपर्क व सेवेतूनच तुमचा ब्रॅण्ड निर्माण करा असा सल्ला गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी फिजीओथेरेपी महाविद्यालयाच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा गुरूवारी डॉ. केतकी पाटील सभागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, डॉ. अमित जैस्वाल, डॉ. अनुराग, डॉ. अश्वीनी कालसेट हे उपस्थित होते. समारंभाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी पुढे बोलतांना सांगितले की, साडेचार वर्षाच्या कालावधीत विद्यार्थी पूर्णपणे समर्पित राहिले. पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही उत्तम संवादक, उत्तम समाजसेवक होण्यासाठी लोकसंपर्क वाढवा. या लोकसंपर्कात सातत्य ठेवा. पुढचे २० वर्ष तरी फिजीओथेरेपीला काहीच चिंता करण्याची गरज नाही. मुंबई पुण्याची मक्तेदारी आपल्या फिजीओथरेपी महाविद्यालयाने मोडीत काढली आहे. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कायम ठेऊन मानवतेच्यादृष्टीने समाजाची सेवा करा असा सल्लाही डॉ. उल्हास पाटील यांनी दिला. यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले की, साडेचार वर्षानंतर तुमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे. यात तुमच्या पालकांचा मोठा वाटा आहे. उत्तम फिजीओथेरेपीस्ट होण्यासाठी नियमांचे आणि तुम्हाला दिलेल्या शिकवणीचे पालन करा असा सल्ला दिला. यावेळी संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेमकुमार पंडीत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांनी केले. सुत्रसंचालन तहसीन शेख, साक्षी राठोड, प्रेरणा गुंजाळ, सृष्टी लाड, पूनम चौहान, दिबा शेख, अल्पेक्षा तिरपुडे, हिमानी सोनार, क्षितीजा जाधव, रिया यादव, पलक पटेल यांनी केले.
८१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान अन् पालक गहिवरले
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या २०१९च्या बॅचमध्ये चार विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर आणि ७७ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. यात डॉ. साक्षी पाटील हिने सुवर्णपदक प्राप्त केले. तर डॉ. समीक्षा भोंगाळे हिला रौप्य पदक, डॉ. अंकीता शिंदे आणि डॉ. मुस्कान गुमनानी या दोन्ही विद्यार्थीनींनी कांस्य पदक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांसह पदवी प्राप्त केलेल्या ८१ विद्यार्थ्यांना माजी खा. डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे हे यश पाहून अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. पदवी प्रदाननंतर विद्यार्थ्यांनी हॅट उडवित प्रचंड जल्लोष केला.