पदवीधर नोंदणी ऑनलाईन करा : प्रा.पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । राज्यभरात सर्व विभागात कुठल्याही शासकीय योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे धोरण राज्य व केंद्र शासन राबवत आहे. पुढील वर्षी होणार्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी पदवीधर मतदार नोंदणी ऑफलाईन सोबतच ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे. आत्तापर्यंत पदवीधरांच्या संख्येच्या मानाने खूप कमी नोंदणी झाली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती नागरीकांना व्हावी यासाठी जनजागृती त्यांनी सुरू केली आहे.
ऑफलाईन अर्ज पदवीधरांना उपलब्ध होत नाहीत. नोंदणी ही तहसील कार्यालयात अर्ज सादर करून घेण्यात येत आहे. त्याबरोबर ओळखपत्र शैक्षणिक अर्हता कागदपत्र तसेच रहिवासी पुराव्याची कागदपत्र जोडावी लागत आहेत. एकत्र गठ्ठ्याने फॉर्म स्वीकारले जात नाहीत, त्यामुळे पदवीधर मतदारांना नोंदणीसाठी आपले काम सोडून एक किंवा दोन दिवस नोंदणी करण्यासाठी घालवावा लागत आहे. बहुतांश पदवीधर हे नोकरी, व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झालेले असतात त्यामुळे अश्या किचकट नोंदणी प्रक्रियेत ते नोंदणी करत नाहीत.
नोंदणी न झाल्याने मतदानावर परिणाम होऊन मतदानाचा टक्का वाढत नाही. कर्जमाफी अर्ज असतील, पीक विमा असे निरक्षरता जास्त असलेल्या शेतकर्यांना ऑनलाईनच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले व त्यांनी ते केले देखील परंतु, राज्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे माहीत असलेल्या पदवीधरांची नोंदणी मात्र ऑफलाईन पद्धतीने होत आहे हे पदवीधारकांचे दुर्भाग्य आहे का? असा सवाल प्रा.पाटील यांनी उपस्थित केला आहे. सध्या ई-सेवांमुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. पदवीधर मतदार नोंदणीही ऑनलाइन झाल्यास मतदान करणार्या पदवीधरांची संख्या वाढेल आणि अतिशय सोप्या पद्धतीने मतदार होता येईल. या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, अशी माहिती ही प्रा. धीरज पाटील यांनी दिली.