जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. खावटी अनुदान योजनेतील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. दरम्यान जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना सरकारकडून 24 कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज आदिवासी खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे बहुतेक जण जेरीस आलेले आहेत. यामुळे आदिवासी समाजासमोरही अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. याची दखल घेत राज्य सरकारने १२ ऑगस्ट २०२०च्या निर्णयानुसार २०१३ पासून बंद पडलेल्या आदिवासी खावटी योजनेला पुनर्जीवीत केले. या योजनेत आधी १०० टक्के अनुदान हे रोख स्वरूपात देण्यात येत होते. मात्र कोविडमुळे उदभवलेल्या स्थितीचा विचार करता, राज्य शासनाने ५० टक्के रोख रक्कम आणि उर्वरित रकमेतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने अनूसुचीत जमानीच्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे. यातील दोन हजार हे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार असून दोन हजारांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातून खावटी योजनेसाठी ६९९४० अर्ज शासानकडे गेले होते. यातील ६३०७३ कुटुंबे यासाठी पात्र झाले आहेत. यामधील ५९,९२८ लोकांनी प्रत्येकी दोन हजार रूपयांची रक्कम देण्यात आली. अर्थात, जळगाव जिल्ह्यात ११ कोटी ९८ लाख ५६ हजार रूपयांची रोख मदत ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तर प्रत्येकी दोन हजार रूपयांच्या किट वाटपास आजपासून प्रारंभ झाला आहे. याच्या वाटपास आजपासून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आदिवासी समुदायाच्या हिताचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कोविडच्या समाजातील सर्व घटकांवर अतिशय विपरीत परिणाम झाला असून यात आदिवासी समुदायाला मदत व्हावी म्हणून खावटी योजनेत रोख आणि जीवनावश्यक वस्तू यांचा मिलाफ करण्यात आला आहे. या समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी किट वाटपास प्रारंभ
जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना प्रति कुटुंब चार हजार रुपये अनुदान देण्यात येते त्यात दोन हजार रुपये किमतीचे वस्तू स्वरुपात वाटप व दोन हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. जिल्ह्यातील 59 हजार 928 कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे.खावटी किट मध्ये मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद, डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाणा तेल गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती अशा स्वरूपाचे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आलेले असून धरणगाव तालुक्यातील बोरगाव आश्रम शाळेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खावटी किट वाटपास प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, संस्थेचे अध्यक्ष भिकुबाई सोनवणे, सरपंच लक्ष्मण भिल, जनाआक्का पाटील, मुख्याध्यापक मनोज ठाकरे, नितीन पाटील,महेश मराठे, किशोर मराठे ,भानुदास पाटील , भैया मराठे, ज्योतीताई सोनवणे यांच्यासह संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक वृंद , कर्मचारी व परिसरातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविकात आदिवासी प्रकल्प अधिकारी अनिता सोनवणे यांनी खावटी योजना संदर्भात सविस्तर माहिती विशद करून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विकास पवार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मनोज ठाकरे यांनी मानले.