जळगाव जिल्हाजळगाव शहर

पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण, जिल्हावासियांचे मानले आभार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थितांना शुभेच्छापर भाषणात पालकमंत्री पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोना सारख्या साथरोगाने ग्रासले असतांना सुद्धा जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासन व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य व सामंजस्य दाखवल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण न होता प्रगती अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करुन जिल्हावासियांचे आभार मानले.

ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून महत्वाकांक्षी जलजीवन मिशन सुरु करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दरडोई किमान 55 लिटर पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ठ पार पाडले असून या कार्यक्रमांतर्गत विशेष आराखडा मोहिमेंतर्गत नळ पाणीपुरवठा नसलेल्या गावांकरीता नवीन योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाडी केंद्रांना नळांद्वारे शुध्द पेयजल पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले असून पाणी गुणवत्ता सर्वेक्षणासाठी प्रत्येक गावातील पाच महिलांचा सहभाग ठेवण्यात आलेला आहे. जानेवारी 2022 पर्यत घरगुती नळजोडणी झाली असून वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेतंर्गत शौचालये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नांना जिल्हावासियांनी चांगली साथ दिल्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येवू शकला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील भरीव तरतूदीतून जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक, कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळा सुरु केली आहे. जिल्ह्यातील उप जिल्हा व ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण झाले असून जिल्हा रुग्णालयात स्कॅनिंगची यंत्रणा सुरू केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयसीयु ,ऑक्सीजनयुक्त बेड तयार केले.

शेतकरी हा राज्याचाच नव्हे तर देशाचा विकासाचा कणा असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन तसेच प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली. या योजनेतून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली आहे. तर कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषि पंपाच्या वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथमवर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कृषिपंप ग्राहकाने चालू बिल भरणे आवश्यक आहे. निसर्गाचीही अवकृपेमुळे अतिवृष्टी, पूर, गारपीटचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना फटका बसला. राज्य शासन शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी धावून आले. जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे मदत करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती बेघर राहू नये, त्याला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य शासनामार्फत महाआवास अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मुख्यमंत्री महोदयांनी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेची जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अतिशय चांगल्याप्रकारे अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना लॉकडाऊनच्या काळात गोरगरिब व गरजूंसाठी वरदान ठरली आहे. यापुढेही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून व जिल्हावासियांच्या सहकार्याने जिल्ह्याची विकासाची घोडदौड यापुढेही सुरु ठेवण्यासाठी बांधील असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण समारंभानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली.

प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकार प्रतापराव पाटील, जळगाव शहर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गिरासे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते त्यांच्या शासकीय निवासस्थानीही ध्वजारोहण करण्यात आले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 च्या आवारातही सकाळी 8.00 वा. ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन करुन सामुहिक राष्ट्रगीत गायन करुन राष्ट्रध्वजास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कृषि विभागाचे उप संचालक अनिल भोकरे, जिल्हा उप निबंधक (सहकार) संतोष बिडवई, सह जिल्हा निबंधक(मुद्रांक) सुनिल पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह प्रशासकीय इमारत आरातील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा :

    Related Articles

    Back to top button