आनंदाची बातमी : हरवलेली मुलगी पोलीसांमुळे आईला परत मिळाली

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ एप्रिल २०२३ | पारोळा येथील उंदीरखेडे रस्त्यावरील संगीता वाकोडे या महिला प्लास्टिक विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. पोटासाठी त्या आपल्या मुलीला सोबत घेऊन नेहमीच गावोगावी फिरून आपला कामकाज चालवतात. त्यांच्या मुलीचे अंजली हे नाव असून ती केवळ सात वर्षांची आहे. शनिवारी अमळनेरच्या मुंदडानगर भागात विक्री करता करता त्यांची मुलगी हरवली आणि त्या खूप घाबरल्या.

मुलीला कोणी पळून तर नेले नाही ना? याची त्यांना भीती होती अखेर त्या रडत रडत पोलीस स्थानकात गेल्या. त्यांनी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. शिंदे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस कर्मचारी राहुल पाटील, शरीफ पठाण, अमोल पाटील, श्रीराम पाटील यांना वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले.

या महिला ज्या भागातून आल्या होत्या. त्या मार्गाची माहिती पोलिसांनी घेतली. गल्लोगल्ली शोध घेतला. सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर नागरिकांनी अमळनेरच्या विविध व्हाट्सअप ग्रुप वर मुलगी हरवली असल्याचे संदेश व्हायरल केले. अखेर सोशल मीडियाच्या मदतीने एका नागरिकाला ती मुलगी सापडली. घाबरलेल्या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगी पोलीस ठाण्यात येताच आईने तिला मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तिने पोलिसांचे आभार मानून आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला.