जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । मौजे जोगलखोरी, पोस्ट वराडसीम, ता. भुसावळ येथे आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे. या गावातील लोकांना प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी जाण्याकरीता खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता.
मौजे जोगलखोरी येथे एसटी महामंडळाची बससेवा सुरु करावी अशी गावकऱ्यांची मागणी होती. त्याअनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, जळगाव यांनी या गावाला भेट देवून प्रवासाबाबत असणाऱ्या अडचणीची पाहणी केली. अडचणीचे निवारण करुन 24 मे, 2023 पासून जोगलखोरी वराडसीम मार्गे भुसावळ नियमित बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, गावकरी यांच्या अडचणी दुर झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
गावातील व परिसरातील सर्व नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे, विभाग नियंत्रक, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.