⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | आनंदाची बातमी : जळगाव एसटीच्या ताफ्यात 10 नवीन बस दाखल !

आनंदाची बातमी : जळगाव एसटीच्या ताफ्यात 10 नवीन बस दाखल !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ गाव, वाड्या आणि वस्त्यांना शहराशी जोडणारी, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली जिल्ह्यातील बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर आहे. महिलांना बस प्रवासात 50% सवलतीचा निर्णय हा यशस्वी झाला आहे. उन्हाळी सुट्टी व लग्नसराई मध्ये जळगाव विभाग 10 दिवसात तब्बल 10 कोटी उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे ला केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने “हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान” ही यशस्वीपणे राबून जळगाव विभाग राज्यात अव्वलस्थानी येण्यासाठी सांघिक प्रयत्न करावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सागर पार्क येथे 10 नवीन साध्या बसेसचे लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

साध्या व इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या ताफ्यात टप्या टप्याने दाखल होणार

जळगाव विभागांमध्ये माहे नोव्हेंबर 2019 मध्ये 839 वाहने होती तर सध्या 723 वाहने उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारणतः 57 वाहने (बसेस) ही मोडकळीस निघालेली आहे. विभागात बऱ्याचशा बसेस जुन्या झालेल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने रस्त्यात ब्रेक डाऊन होत असतात. त्यामुळे बऱ्याचश्या उशिरा धावतात व काही वेळेस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहे. त्यामुळे रा.प. महामंडळाकडे लोकप्रतिनिधी, विध्यार्थी व प्रवाश्यांच्या वारंवार तक्रार उद्भवत असतात. आगामी काळात लग्नसराई असून महिलांना 50 % सवलतीमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार विभाग नियंत्रक बी.सी. जगनोर यांनी साध्या नवीन 100 बसेचा मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून नवीन 100 साध्या बसेस व 141 इलेक्ट्रिक बसेस मिळाव्या अशी मागणी केली होती. त्यानुसार 10 नवीन साध्या बसेस प्राप्त झाल्या असून ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

राज्यात लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस ही आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक पाचोरा 21, मुक्ताईनगर 17, चोपडा 21 तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी 62 अश्या 141 इलेक्ट्रिक बसेसला पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने मान्यता दिली असून लवकरच जिल्ह्यातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी टप्याटप्याने दाखल होणार आहे. जळगाव, पाचोरा , चोपडा व मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचेही श्री. जगनोर यांनी सांगितले.

उत्पन्न वाढीत जळगाव विभाग महाराष्ट्रात प्रथम

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय नियंत्रक बी एस जगनोर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील चालक, वाहक, यांत्रिक व इतर कर्मचारी तसेच पर्यवेक्षकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या सांघिक प्रयत्नाने दिवाळी -2022 या कालावधीत उत्पन्न व प्रवास कि.मी. मध्ये वाढ करून विभागाला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर ठेवण्यात यश प्राप्त झाले होते. तसेच सध्या लग्नसराई असून महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलतीमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे उन्हाळी गर्दी हंगाम -2023 मध्ये जळगाव विभाग उत्पन्नवाढी मध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याने विभाग नियंत्रक यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महिलांच्या प्रवासवारीने एसटी महामंडळ झाले मालामाल

शासनाने महिलांना बस भाड्यात 50% सवलत दिल्याने जळगाव जिल्ह्यात दररोज तब्बल 1 लाख महिला प्रवास करीत आहे. एकूण प्रवासी संख्येपैकी 40% प्रवासी या महिला आहेत. 1 मे ते 10 मे या 10 दिवसाच्या कालावधीत मंडळाला 10 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाल्याने जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रात प्रथम आला आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्न वाढीत महिलांची प्रवासवारी लाभदायक ठरत आहे.

लोकार्पण सोहळ्याला आमदार चिमणराव पाटील, विभाग नियंत्रक बी. सी. जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी कमलेश भावसार, उपअभियंता अजय पाटील, अर्चना भदाणे, डेपो मॅनेजर संदीप पाटील, विजय पाटील, आर. के. पाटील, राहुल पाटील, एस टी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक बी सी जगनोर यांनी केले. त्यांनी विभागातील सांघिक प्रयत्न॔बाबत माहिती विशद केली. सूत्रसंचालन कामगार अधिकारी कमलेश भावसार यांनी तर आभार डेपो मॅनेजर संदीप पाटील यांनी मानले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह