जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२३ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमती एका विशिष्ट पातळीपासून वरखाली होत आहे. धनत्रयोदशीनंतर घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात दोन दिवसांपासून पुन्हा मोठी वाढ झाली. काल शुक्रवारी सोने ५०० रुपये प्रति तोळ्याने तर चांदी ५०० रुपयांनी महागली. सणासुदीचे दिवस होताच आता लग्नसराईचे दिवस सुरु होतील. त्याआधीच दोन्ही धातूंच्या किमती वाढताना दिसत आहे. अमेरिकन डॉलरचे दर वधारत असल्याने सोने-चांदीच्याही भावात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षीच्या दिवाळीपेक्षा यंदाच्या दिवाळी सोन्यासह चांदीचा दर अधिक होता. गेल्या आठवड्यात धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुन्हा १५० रुपयांची वाढ होऊन ते ६० हजार ८५० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. मात्र लक्ष्मीपूजन व त्यानंतर भावात घसरण होत जाऊन ६० हजार ४०० रुपयांवर आले. आता गुरुवार, १६ नोव्हेंबरपासून पुन्हा भाववाढ सुरू झाली आहे व गुरुवारी सोने ६१ हजारांवर पोहचले. त्यानंतर शु्क्रवार, १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन सोने ६१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७४ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी ७० हजार ४०० रुपयांवर आलेले चांदीचे भाव गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी ७३ हजार ७०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ७४ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
चांदी अडीच महिन्यांच्या उच्चांकीवर
जुलै व ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. सप्टेंबर महिन्यात चढ-उतार होत राहून ४ सप्टेंबर रोजी चांदी ७४ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर तिचे भाव कमी-कमी होत गेले. त्यानंतर आता १७ नोव्हेंबर रोजी चांदी पुन्हा एकदा ७४ हजार २०० रुपयांवर पोहचली आहे.