जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । Gold-Silver Price : सोने आणि चांदीचा भाव दिवसागणीक वाढत आहे. मागील सलग तीन दिवस सोने आणि चांदीचे भाव वधारले. काल बुधवारी जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल ७२० रुपयाची वाढ झाली होती. आज गुरुवारी बाजार बंद असल्यामुळे दर जाहीर झालेले नाहीय.
काय आहे आजचा प्रति तोळ्याचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,१२० रुपये इतका आहे. तर चांदी ७०,४०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
रशिया-युक्रेनमधील युद्ध ५० हुन अधिक दिवस होत आले तरीही अजून सुरुच आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल होत असल्याचे दिसून येतेय. सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोनं हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरु शकतो. त्यामुळे सध्या सोन्याकडे गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या काही दिवसात सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते. गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.
दरम्यान, गेल्या आठवड्यात सोने ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घट दिसून आलीय. चांदीच्या दरात ८०० रुपयापर्यंत ची घट दिसून आलीय. मात्र चालू आठवड्यात सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढीस लागले आहे. तीन दिवसात सोने १ हजार रुपयांने महागले आहे. तर दुसरीकडे चांदी २०७० रुपयाने वधारले आहे. येत्या आणखी काही दिवसात दोन्ही धातूंमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये ४ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,५५० रुपये होते. तर ५ एप्रिल रोजी ५२,७४०, ६ एप्रिल रोजी ५२,५८०, तर ७ एप्रिल ५२,८१० व ८ एप्रिल ला ५३,११० रुपयावर होता. तर दुसरीकडे ४ एप्रिल रोजी चांदी दर ६८,३०० प्रति किलो होती. ५ एप्रिल ६७,८५०, ६ एप्रिल ६७,७५० तर ७ एप्रिल ला ६७,८६० तर ८ एप्रिल ला ६८,३३० प्रति किलो इतका होता.
सोन्याची प्युअरीटी कशी तपासावी?
सोनं शुद्ध आहे की अशुद्ध, हे तपासणं सोनं खरेदीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. सोनं खरेदीवेळी त्यावर हॉलमार्कचे निशाण असतात. या हॉलमार्कवर 24 कॅरेटपर्यंतची माहिती दिलेली असते. 22 कॅरेट सोनं असेल तर त्यावर 916 असं नमूद केलेलं असतं. तर 21 कॅरेट सोन्यावर 875 असं लिहिलेलं असतं. 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 असं नमूद केलेलं असतं.