⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

युद्धामुळे स्वस्ताईचे स्वप्न भंगले ; सोने-चांदीच्या किमतीने घेतली मोठी झेप

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे सोने-चांदीने (Gold Silver Rate) मोठी मुसंडी मारली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण सुरु असल्याने दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र आता या युद्धामुळे स्वस्ताईचे स्वप्न भंगले असून या मौल्यवान धातूंच्या दरात दररोज वाढ होत आहे. सध्या पितृपक्षामुळे ग्राहकांची बाजारात गर्दी नसली तर किंमती वधारल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

गुडरिटर्न्सनुसार, गेल्या शुक्रवारी हमासने इस्त्राईलवर हल्ला चढविल्यापासून किंमतींनी मोठी झेप घेतली. 6 ऑक्टोबर रोजी 70 रुपये, शनिवारी 310 रुपये, 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची, 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी किंमती वधारल्या. 10 ऑक्टोबर रोजी किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली. 11 ऑक्टोबर रोजी किंमती जैसे थे होत्या. सध्या 22 कॅरेट सोने 53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,680 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीने घेतली मोठी झेप :
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला चांदीत पडझड झाली होती. युद्धानंतर चांदीत तेजीचे सत्र आले. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वधारल्या. 11 ऑक्टोबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,100 रुपये आहे.

दरम्यान, पितृपक्ष सुरू झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती पाहता हे भाव दिवाळीपर्यंत आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. असे असताना मध्येच हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्ध भडकले व त्याचा मोठा परिणाम होऊ लागला. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी होत जाणारे भाव आता पुन्हा वाढू लागले आहे.