जळगाव लाईव्ह न्यूज । भडगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यात साधूवेशातील भामट्यांनी आशिर्वादाच्या बहाण्याने दाम्पत्याकडील सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेबाबत असे की, राजेंद्र भिकनसिंग पाटील व त्यांची पत्नी सुरेखा राजेंद्र पाटील हे आपल्या गावी वडगाव मुळाने येथे मोटारसायकलने जात असताना भडगावच्या पुढे कोठली फाट्याजवळ साधूवेशातील दोन इसमांनी त्यांना थांबवले. पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या मारुती स्विफ्ट कारमधून आलेल्या या इसमांनी नाशिककडे जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने संवाद साधला.

यानंतर “आशिर्वाद देतो” असे सांगत त्यांनी दाम्पत्याला १०० रुपये दिले व त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या देण्यास सांगितले. क्षणिक भुलवणुकीला बळी पडून वयस्कर दाम्पत्याने अंगठ्या काढून दिल्या. पुढे “मोटारसायकल साईडला लावा, आशिर्वाद देतो” असे सांगत त्या दोघांना थांबवून साधूवेशातील इसम स्विफ्ट कार घेऊन पसार झाले.

या घटनेनंतर पाटील दाम्पत्याने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, परिसरात नागरिकांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. साधूवेशाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.



