⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

गोलाणी मार्केट झाला दुचाकी चोरट्यांचा कट्टा, दरवर्षी शेकडो दुचाकींची चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । शहरात चोरट्यांचा प्रमाण वाढला असून दि.२१रोजी शहरातील चंदू आण्णानगरात परशुराम यशवंत पाटील (वय ४२) यांची गोलाणी मार्केट येथील पूजा ऑप्टिकल या दुकानासमोर उभी दुचाकी लांबविल्याची घटना पुन्हा घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

चंदू आण्णानगरात परशुराम यशवंत पाटील हे ते पत्रकार आहेत. गोलाणी मार्केट येथे त्यांचे कार्यालय आहे. परशुराम पाटील हे १६मे रोजी कार्यालयात आले. यादरम्यान सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची एम.एच.१९ बी.एच.२८८१ या क्रमांकांची दुचाकी नेहमीप्रमाणे गोलाणी मार्केट येथील पूजा ऑफ्टिकल या दुकानासमोर उभी केली.  रात्री साडेसात वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही.  चार ते पाच दिवस सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न मिळाल्याने अखेर परशुराम पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन शनिवार, २१ मे रोजी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे हे करीत आहेत.

शहरातील गोलाणी मार्केटमध्ये अनेक दुकानदारांकडे सीसीटीव्ही आहेत. पण रोज गाड्या चोरीला जात असल्याने पोिलसांना त्या सीसीटीव्ही फुटेज द्यावा लागतो. यासाठी नको भानगड म्हणून व्यापाऱ्यांनी हे सीसीटीव्ही खाली करून दुकानापर्यंत मर्यादीत ठेवले आहे. याठिकाणी प्रत्येक विंगमध्ये दर्शनी भागात व्यापाऱ्यांनी कॅमेरे बसविले तर दुकानाचे संरक्षण होईल तसेच चोरट्यांवरही अंकुश राहील. यासाठी पोिलस प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी होत आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरट्यांचा शोध लागल्यानंतरही चोरीच्या घटना सुरुच आहेत. बिनधास्तपणे आठवडे बाजार, संकुल आदी भागातून दुचाकी लांबविल्या जात आहेत. रोज दुचाकीच्या घटना घडत आहेत. पञकारांच्याही दुचाकी चोरीला जात असल्याने सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुचाकी चोरट्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

शहर व उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दुचाकी वाहनांची संख्या वाढल्यामुळे त्या चोरीला जाण्याच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत असले तरी दाखल गुन्हे उघडकीस आणण्याकडे जळगावच्या पोलिसांचा कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे.