खुशखबर! गिरणा धरणाने शंभरी गाठली, पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२४ । यंदा वरुणराजा चांगला बरसल्याने जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली. काही धरणांनी शंभरी गाठली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणही १०० टक्के भरले आहे. यामुळे केवळ पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला नाही तर यंदा शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे.
गिरणा धरणाच्या कार्यक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने गिरणा धरण गुरुवारी १२ रोजी सायंकाळी ६ वा. १०० टक्के भरले आहे. सन १९६९ पासून ते आतापर्यंत एकूण १३ वेळा शंभर टक्के भरले आहे. गिरणा धरणावर एकूण १७४ गावे पिण्याचे पाणी व शेतीसाठी तसेच शंभरापेक्षा अधिक पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत.
त्यामुळे या पाणी योजना आणि गावातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. गिरणा धरणामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर व पारोळा व जळगाव तालुक्यातील काही भागातील सुमारे ५२ हजार २०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या धरणावर अवलंबून असणाऱ्या चार नगरपालिका व इतर गावांचा पिण्याच्या पाणी प्रश्न सुटला आहे.
गिरणा धरणात गेल्या ५२ टक्के तर जून २०२४ मध्ये केवळ ११ टक्के इतकाच जलसाठा होता. मात्र गेल्या महिन्यापासून नाशिक जिल्ह्याच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सातत्याने झाला. चणकापुर, पुनद, केळझर, हरणबारी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.