जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२५ । राज्यातून मान्सून पावसाने माघारी घेतली आहे. तरी पण पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागच्या तीन चार दिवसापासून जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली.

यामुळे आज दि २८ रोजी दुपारी ३ वाजता गिरणा धरणाचा विसर्ग 7428 क्युसेक्स वरून वाढून 9904 क्युसेक्स (280.28 क्युमेक्स) करण्यात आलेला आहे.सध्यास्थितीत गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्र 1 व 6 हे प्रतेकी 60 सेमी व वक्रद्वार क्र 2,3,4 व 5 हे प्रतेकी 30 सेमी ने उघडे आहेत. यामुळे गिरणा नदीला पूर आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गिरणेत येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग कमी अथवा वाढविण्यात येईल, अशी माहिती चाळीसगावचे उपविभागीय अभियंता यांनी दिली.

दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. मोंथा असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार असून आगामी ४८ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आगामी दोन दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे.








