जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२३ । एरंडोल तालुक्यातील टोळी खुर्द येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. हळदीच्या दिवशीच तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गायत्री विजय पवार असे मृत तरुणीचे नाव असून यामुळे गावात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, गायत्री हिने आत्महत्या सारखे पाऊल का उचललं हे अद्यापही कळू शकले नाही.
नेमकी काय आहे घटना?
गायत्री पवार हीच्या वडिलांचेही यापूर्वी निधन झाले आहे. ती गावात आई,भाऊ, काकांसोबत राहत होती.गायत्रीचे करमाड (ता. पारोळा) येथील तरुणाशी लग्न ठरले होते. २८ रोजी लग्न असल्यामुळे २७ रोजी करमाड येथे हळद लागणार होती. त्यासाठी २७ रोजी सकाळी नवरीला घेण्यासाठी करमाड येथून सकाळी १० वाजता गाडी आली होती. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती.
सर्व नातेवाइकांना पत्रिका वाटण्यात आल्या. लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. नवरी मुलीस घेऊन जाण्यासाठी गाडीसोबत पाहुणे आले. त्यांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण नवरीच्या निघण्याची तयारी करत होते. त्याचवेळी गायत्री मोबाइलवर बोलत घराबाहेर पडली. तिला जवखेडा रोडकडे जाताना अनेकांनी पाहिले. नंतर तिच्या मागे कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता, वासुदेव कासार यांच्या विहिरीजवळ तिचा मोबाइल आढळला. तर विहिरीत तरुणी तरंगताना दिसली. नातेवाइकांनी तिला विहिरीबाहेर काढून एरंडाेल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, गायत्रीचा काही दिवसांपूर्वीच टोळी येथे साखरपुडा झाला होता. तिला शेवटचा फोन कोणी केला, याचा शोध घेतला जात आहे. घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही.