⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

राम मंदिराच्या मुद्द्यावरून गिरीश महाजनांची शिवसेनेवर घणाघाती टीका; म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं असून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी घणाघाती टीका केली आहे. श्रीराम जन्मीभूमीतील मंदिर पूर्ण होण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना प्रयत्न करीत आहे. आता तर ‘शिवसेनेने, काँग्रेस एमआयएमच्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे,’ अशी घणाघाती टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

गुरुवारी भारतीय जनता पार्टीची बैठक जळगाव वसंत स्मृती कार्यालयात झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा ना.रंजना पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख अ‍ॅड.किशोर काळकर, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, किसान मोर्चा नारायण चौधरी, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पी.सी.पाटील,जि.प.सदस्य मधुकर काटे आदी भाजपचे आघाडी प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.महाजन म्हणाले की, ‘राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे. काल जे झाले ते अतिशय वाईट आहे. शिवसेना आपल्या मुख्य तत्वापासून बाजूला जाऊन अशी भरकटेल असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता.’

‘काँग्रेस आणि एमआयएमच्या पुढे जात शिवसेनेने हिंदुत्वाविरोधी काम करण्यास सुरुवात केली असे वाटायला लागले आहे. प्रभू श्री रामचंद्र हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांचे मंदिर व्हावे म्हणून संपू्र्ण देशाने, मुस्लिमांनीही त्याचे स्वागत केले आहे. मात्र, हे शिवसैनिक वाटेल तसे तोंडसुख घेत आहेत. त्यांनाही माहीत आहे, विषय काय आहे? पण विरोधाला विरोध करावा म्हणून कुठल्याही विषयावर बोलायचे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. इतकी अधोगती शिवसेनेची कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत,’ असा टोलाही महाजन यांनी यावेळी लगावला.

‘श्री राम मंदिरावरुन काल भाजपाचा मोर्चा गेला असता, सर्व शिवसैनिक तेथे जमले आणि त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. सर्वांनी ते पाहिले आहे. कुणी विरोधात बोलले तर आम्ही त्याचे उत्तर गुद्दयाने देऊ, लाठीकाठीने देऊ ही भूमिका सत्ताधारी शिवसेनेची झाली आहे आणि ती चुकीची आहे,’ असंही महाजन यांनी सांगितलं आहे.