जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२३ | जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमारावर राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य करत शरद पवार, उध्दव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्या कार्यकाळात ५० वर्षांत, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला त्यांनी आरक्षण का दिले नाही? असा सवाल देखील मंत्री महाजन यांनी केला.
जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधतांना गिरीश महाजन म्हणाले, की लाठीमाराची घटना दुर्दैवीच आहे; परंतु मराठा समाजासाठी काहीही न करणाऱ्या विरोधकांना एवढा कळवळा आताच कसा आला. शरद पवार गेली पन्नास वर्षे सत्तेत होते. त्यांनी आरक्षण दिले नाही. उलट ते म्हणाले होते, मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे? त्यांच्या या वक्तव्याची माझ्याकडे क्लीप असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच वर्षे सत्तेत होते. त्या वेळी त्यांनीही आरक्षणसाठी प्रयत्न केले नाही. त्या वेळी ते कधीही घराच्या बाहेर निघाले नाहीत. आता आंदोलकांना भेटायला निघाले आहेत. त्याचे प्रेम हे पुतणा मावशीचे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते; मात्र सत्ता असताना विरोधकांना ते न्यायालयात टिकविता आले नाही. त्यांनी त्यासाठी चांगला वकील देण्याचा प्रयत्नच केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
आंदोलकांवर लाठीमाराची घटना घडायला नको होती; परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. परंतु शासनातर्फे उपोषणकर्त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जिवाचे बरे-वाईट होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांचे उपोषण सोडविणे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते, असेही त्यांनी नमूद केले.