जळगाव लाईव्ह न्युज | ८ डिसेंबर २०२२ | कापसाच्या उत्पादनात जळगाव जिल्ह्याचा डंका केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाजतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता त्याचा परिणाम कापसाशी निगडीत अन्य व्यवसायांवर देखील जाणवू लागला आहे. कापसाला मागील वर्षी ११ ते १४ हजारांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तो यंदाही मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या गाठींना मागणी कमी झाली आहे. यामुळे व्यापारीही जास्त दर देण्यास तयार नाहीत. मागणी व पुरवठा याचे गणित बिघडल्याने जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व्यवसाय अडचणीत आलेला दिसत आहे. कापसाअभावी जिल्ह्यातील १५० पैकी केवळ निम्म्या जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू आहेत. याशिवाय कापसाची वाहतूक करणारे छोटे वाहतूकदारही अडचणीत आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात यंदा सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादन कमालीची घट झाली आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दरही घसरू लागले आहेत. कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून ९ हजारांच्या आसपास स्थिरावलेला आहे. गेल्यावर्षी १४ हजार रुपयांवर पोहोचलेला कापसाचा भाव यावर्षी सुरुवातीपासूनच ९ हजारांच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे. यामुळे शेतकरी कापूस विक्री करण्याऐवजी साठवणूकीवर भर देतांना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८० टक्के कापूस शेतकर्यांच्या घरात आला आहे. तज्ञांच्या मते, घरात अधिक काळ कापूस ठेवल्यास दर्जा आणि वजनातील घट तोट्यात घालणारी असते, याचाही शेतकर्यांनी विचार करणे आवश्यक आहे.
शेतकर्यांनी दिवाळी सणासाठी हाती पैसा यावा म्हणून शेतकर्यांनी थोड्याफार प्रमाणात कापसाची विक्री केली. गतवर्षाप्रमाणे यंदाही भाव वाढतील या या आशेने कापसाची साठवणूक केली. शेवटी अपेक्षित प्रमाणात जिनिंगकडे कापूस उपलब्ध होत नव्हता. यामुळे कापासाच्या दरात थोडीफार वाढ झाली. सध्या कापूस साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दरात विक्री होत असून येत्या काही दिवसात कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल अशी शेतकर्यांची आशा आहे. मात्र कापूस सरकीचे भाव कमी झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला अपेक्षित असा उठाव नसल्याचे कारण पुढे करत कापसाची दरवाढ होणार नसल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
५० टक्के जिनिंग बंद
कापूस निर्यात बंद आहे. कापूस निर्यात सुरू झाली, की कापसाला मागणी वाढून १३ ते १४ हजारांचा दर कापसाला मिळेल, अशा अफवांचे पीक सोशल मीडियाच्या माध्यमातून आले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात अडकला आहे. बाजारात कापूसच येत नसल्याचे चित्र आहे. दोन लाख गाठींचा कापूस रोज हवा. मात्र, २५ ते ३० हजार गाठींचा कापूस मिळतोय. कापूस नसल्याने ५० टक्के चालकांनी जिनिंग बंद केल्या आहेत. ज्या सुरू आहेत त्या कमी क्षमतेने सुरु आहेत. कापसाशी संबंधित उद्योग काहीअंशी संकटात आहेत. अशीच परिस्थिती शेतकर्यांचीही आहे. कारण कापसाचे दर वाढत आहेत मात्र कापूस उत्पादित करण्यासाठी लागणारा खर्च देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कापूस वेचणीसाठी १२ ते १४ रुपये प्रति किलो एवढी मजुरी मोजावी लागत आहे. तसेच पेरणी पासून ते वेचणी करण्यापर्यंत बियाणे, खत, औषध इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यामुळे कापसाची शेती परवडेनाशी झाली आहे.