⁠ 

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी; एक्स्प्रेस गाड्यांच्या जनरल डब्यांची संख्या वाढणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रशासनाने हळूहळू सामान्य तथा स्लीपर डब्यांची संख्या कमी केली होती. त्याऐवजी वातानुकूलित डबे वाढविले होते; मात्र सद्यःस्थितीत प्रवाशांची वाढती गर्दी पाहता प्रशासनातर्फे महिनाभरात सामान्य डब्यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.

रेल्वे प्रशासनातर्फे बहतांश रेल्वे गाड्यांमधून जनरलसोबत स्लीपर डब्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्या जागी वातानुकूलित (एसी) डब्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांसह गोरगरिबांना रेल्वेचा प्रवास गैरसोयीचा व महागडा झाला आहे. काही वर्षांपूर्वी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना १२ ते १४ डबे असायचे. त्यात एसीचे तीन किंवा चार डबे तर उर्वरित डबे जनरल आणि स्लीपर कोचचे असायचे

प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत काशी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, पंजाब मेल, दादर-अमृतसर एक्स्प्रेस, दानापूर-पुणे एक्स्प्रेस यासह जवळपास सर्वच गाड्यांमध्ये डब्यांची संख्या २२ ते २४ पर्यंत वाढविण्यात आली. ही संख्या वाढविताना जनरल, स्लीपर डब्यांची संख्या कमी करून त्याजागी एसी कोच लावण्यात आले. सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये दोन ते तीनच डबे जनरल ठेवण्यात आले आहेत.

मात्र, आता रेल्वे प्रशासन सामान्य क्लासचे डबे वाढविणार आहे. ज्या गाड्यांमध्ये प्रवाशांची जास्त संख्या आहे, त्या गाड्यांना सुरुवातीला जनरल डब्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.