⁠ 
रविवार, मे 19, 2024

घरोघरी आज होणार गौरींची स्थापना, गणेशोत्सवाच्या उत्साहाला येणार उधाण!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । गणपतीचे आनंदाने स्वागत केल्यानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी धुमधडाक्यात गौरींचे देखील स्वागत केले जाते. गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते. सोबतच त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते.

गौरींची पुराणिक कथा अशी कि फार पूर्वी आसुरांचे राज्य होते. आसुर देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. यामुळेच सर्व देवांच्या स्त्रिया एकत्र जमून त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतू असतो.

गौरी शब्दाचा अर्थ

कथेनुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाघ्रात अशी पवित्र कन्या. गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, तुळशीचे झाड, जाई चे वेल, व वरून पत्नी गौरी चे संस्कृत शब्दकोशात दिलेल्या अर्थानुसार हेही अर्थ आहेत. याआधारे तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते. गौरीला महालक्ष्मी म्हणतात व  तो सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णूपत्नी तर महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वती होय. जी जेष्ठा गौरी म्हणून संबोधली जाते.

गौरींच्या मांडणीची पद्धत 

गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी हातनसलेल्या उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी प्रथा वेगळी असते. यामध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी “गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली” असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोब-याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढेलाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, वस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद-कुंकू, साखर देतात. दुस-या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुस-या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात.

तिस-या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करण्यात येते. गौरी या माहेवाशिणी असतात म्हणून या तीन दिवसात त्यांची  होईल तितकी सेवा करून त्यांना वाटे लावतात. गणपतीच्या उस्तवात गौरी देखील अजून भर टाकतात. या प्रमाणे गौरींचे आगमन होते, व तिसऱ्यादिवशी विसर्जन केले जाते.