जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । चाळीसगाव येथील पाटणादेवीच्या जंगलात जुनोने भागात अवैधरित्या प्रवेश करून, धावडा वृक्षातून डिंक काढणाऱ्या बऱ्हाणपूरच्या टोळीला, वन विभागाने १२एप्रिलला जेरबंद केले. या कारवाईत चौघे जण हाती लागले तर दोन संशयित जंगलात पसार झाले. चोरट्यांकडून २८ किलो ओला डिंक व गुन्ह्यात वापरण्यात आलेली ऑटोरिक्षा जप्त केली आहे. संशयितांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जप्त केलेल्या डिंकाची किंमत सुमारे १४ हजार रुपये आहे.
अधिक माहिती अशी की, औरंगाबाद वनविभागांतर्गत येणाऱ्या गौताळा (पाटणादेवी) अभयारण्यात, चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील जुनोने भागात, डिंक तस्कर आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनरक्षक माधुरी जाधव, राहुल पवार यांच्यासह पथकाने चौघांना पकडले. या कारवाईत ऍपेरिक्षा चालक बहादूर निजाम तडवी (वय ३३, रा. विवरे बु., ता. रावेर), तुराब नवाब तडवी (वय २२), अमजद सलीम तडवी (वय २१), धुरसिंग इस्माईल बारेला (वय ४८, तिघे रा. वर्डी, ता. जि. बऱ्हाणपूर) हे ऑटोरिक्षासह हाती लागले, तर अन्य दोघे पसार झाले. पथकाने धावडा वृक्षातून काढलेला ओला ताजा २८ किलो डिंक व गुन्ह्यात वापरलेली ऍपेरिक्षा (क्र. एम.एच.१९ बी.जे.२८०६) असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम व भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा झाला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बोढरा वनपाल डी. के. जाधव, वनरक्षक माधुरी जाधव, ए. जे. जाधव, वाहनचालक बापू अगोणे, राहुल पवार, मजूर कैलास राठोड, पतींग राठोड, रामेश्वर राठोड, गौतम अळिंग, बाबासाहेब अळिंग यांच्या पथकाने केली.