⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गणेशोत्सव : सामाजिक समरसता, गणेश मंडळ कार्यकर्ते, पोलीस आणि समन्वयाचा अभाव!

गणेशोत्सव : सामाजिक समरसता, गणेश मंडळ कार्यकर्ते, पोलीस आणि समन्वयाचा अभाव!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । गणेशोत्सव.. बाप्पाचे आगमन म्हटले कि एक अभूतपूर्व उत्साह संचारतो. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्नित वातावरण निर्माण होते. यंदा तर दोन वर्षाची कोरोनाची मरगळ दूर सारत बाप्पाचे आगमन झाले असल्याने सर्वच जल्लोषात आहे. जळगावात देखील यंदा गणेश भक्त आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार दिसून आला. राज्यात मुख्यमंत्र्यांनी देखील निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याचे जाहीर केल्यानं सर्वांना जास्तीचा आनंद आहे. जळगावात गणेशोत्सवाच्या दिवशी शहरात तर पाचव्या दिवशी धानोऱ्यात घडलेल्या घटनेने गणेश मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला.

जळगाव जिल्ह्यासह राज्यात यावर्षी गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जात आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळ असल्याने गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. कोरोनाचे सावट यंदा दूर झाले असून त्यातच नवीन सरकारने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे देखील जाहीर केले आहे. गणेशोत्सव साजरा होणार आणि त्यात निर्बंध नाही, हे म्हणजे गणेश मंडळ कार्यकर्त्यांसाठी दुग्धशर्करा योगच. दरवर्षीप्रमाणे गणेश मंडळांची बैठक. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतलेला आढावा. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत करण्यात आलेली चर्चा आणि तगडा पोलीस बंदोबस्त यामुळे सर्व शांततेत पार पडणार अशी सर्वांना खात्री होती.

गेली दोन वर्षे गणेशोत्सव नसल्याने जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा पोलिसांशी संबंधच आला नाही. गणेश विसर्जन मिरवणूक आणि गणेश मंडळांशी आजवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने साधलेला संवाद यामुळे सर्व शांततेत पार पडणार अशी शाश्वती होती. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आपसात नेहमी समन्वय असतो. कदाचित कुठे कुणाचा वाद झालाच तर तो त्याच ठिकाणी संपतो. जळगाव शहरात सर्वात मोठी श्री विसर्जन मिरवणूक असते. स्व.डॉ.अविनाश दादा आचार्य आणि सहकाऱ्यांनी तेव्हा घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे आज देखील पालन होते.
हे देखील वाचा : तब्बल ६ महिने होती ‘प्रति पंढरपूर’ची आरास, बैलगाड्या भरून आले होते भाविक, विद्यार्थ्यांच्या सहली

सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी जळगावात सुरु केलेले पॅटर्न आदर्श पॅटर्न मानला गेला आहे. मंडळ आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची मोठी भूमिका महामंडळ पार पाडत असते. मिरवणुकीवर लक्ष ठेवायला महामंडळाचे स्वतःचे गणसेवक देखील असतात. सर्वांना सांभाळून घेणे आणि योग्य पद्धतीने गणेशोत्सव शांततेत पार पाडला जातो. गणेशोत्सव ज्या उद्देशाने सुरु करण्यात आला होता त्याचे पालन होण्यासाठी महामंडळ नवनवीन उपक्रम देखील राबविते. सामाजिक उपक्रमांचे आयोजन, कोरोना काळात मदतकार्य, सामाजिक समरसतेची आरती, महिलांच्या हस्ते महाआरती, रक्तदान शिबीर, निर्माल्य संकलन असे अनेक उपक्रम आजवर राबविण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या असलेल्या आणि कोरोनामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी फारसा संबंध न आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्याबद्दल माहिती नाही. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी टॉवर चौक ते शिवतीर्थ मैदान चौकापर्यंत सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन-तीन वेळा बाचाबाची झाली. गणेश मंडळ म्हटले कि कार्यकर्ते, ढोल-ताशे, गुलाल, जल्लोष असणारच.. सहाय्यक अधीक्षक नेमके यालाच विरोध करीत होते. त्यातच टॉवर चौकात सुरु असलेल्या सामाजिक समरसतेच्या आरतीवर त्यांनी आक्षेप घेतला. शब्दाला शब्द वाढला आणि वाद वाढू लागला. दोन्ही आपल्या भूमिकेवर ठाम होते परंतु नंतर महामंडळाच्या समजूतदारपणामुळे वाद मिटला.
हे देखील वाचा : कालनिर्णयकार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेश महामंडळाची स्थापना

सायंकाळी पुन्हा नेहरू चौकात असेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना चालढकल करताना पोलीस आणि मंडळ कार्यकर्ते असा वाद होणार होता परंतु तो थोडक्यात टळला. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा आयपीएस अधिकारी असून त्यांच्या मराठी, हिंदी भाषेची अडचण असल्याने बऱ्याचदा जळगावकरांची भाषा आणि रांगडा आवाज त्यांच्या पथ्यावर पडत नाही. कुठेतरी काही गैरसमज होऊन वाद होतो. गणेश मंडळाचे कार्यकर्ते कोणताही धिंगाणा न घालता आणि कुणालाही त्रास न देता गणेशाचे स्वागत करीत असल्याने पोलिसांना त्यांना रोखणे किंवा चालढकल करणे योग्य नाही. एका मंडळाचा बँजो देखील पोलिसांनी जप्त केला होता.

दोन दिवसांपूर्वी धानोरा येथे पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन होते. बैठकीत अगोदर ठरल्याप्रमाणे सार्वजनिक मिरवणुकीसाठी रात्री ११ वाजेची वेळ निश्चित करण्यात आली होती. मिरवणूक शांततेत सुरु असताना अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण दांडगे यांनी १० वाजता मिरवणूक थांबवली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर वाद्य वाजविण्याचा मागणीसाठी ठिय्या मांडला असता पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. सर्व काही इतके अचानक झाले आणि बचावासाठी ग्रामस्थ व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली. पोलिसांनी गावातून पळ काढला पण मिरवणुकीला मात्र गालबोट लागले. रात्री उशिरापर्यंत गावात तणावपूर्ण शांतता होती.
हे देखील वाचा : १९८५ ला सुरु झाली सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक, १९८८ ला लागले गालबोट

गणेशोत्सव सर्वकाही शांततेत पार पडतो आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सर्वांशी समन्वय साधत असताना इतर अधिकाऱ्यांमुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घटनेची स्वतः शहनिशा केली, काही ठिकाणी पदाधिकारी स्वतः उपस्थित होते. पोलिसांच्या चालढकल प्रकारचे ते देखील साक्षीदार आहे. वातावरण दूषित होऊ नये यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे काही समाजकंटक वातावरण दूषित करण्यासाठी टपलेलेच आहेत. पोलिसांनीच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय राखला नाही तर समाजकंटकांशी पोलीस कसे लढणार हा मोठा प्रश्न आहे.

आजवर दरवर्षी गणेश मंडळ कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनातील समन्वय जळगावकरांनी पाहिला आहे. वर्दीत मिरवणुकीत ठेका धरणारे पोलीस कर्मचारी, मध्यरात्री वाद्य बंद झाल्यावर अर्ध्या तासाचा समरी पॉवरमध्ये वेळ वाढवून देणारे पोलीस अधिकारी जळगावकरांनी पाहिले आहे. एकदा मिरवणुकीला गालबोट लागले होते तेव्हापासून आजवर जळगाव शहरात मिरवणूक शांततेत पार पाडली जात आहे. पोलिसांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांभाळून आणि समजून घेणे आवश्यक आहे. पोलीस आपल्याच पद्धतीने मिरवणूक हाताळू पाहत असतील तर सार्वजनिक गणेश महामंडळ देखील त्यातून हात काढून घेईल आणि मग नको ते वाद होऊन बसतील. शेवटच्या दिवशी मिरवणुकीत मंत्री, खासदार, आमदार सर्वच सहभागी होत असल्याने जळगावकर आणि प्रशासनाच्या दृष्टीने आताच योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.