जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । शहरातील मेहरूण तलावासमोर रनिंग करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या बॅगा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मोबाईल आणि रोकड असा एकुण २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी दररोज मेहरूण तलाव परिसरात सकाळी आणि सायंकाळी रनींगसाठी जात असतात. विकी नागेश मुंडोकार (वय-२५) रा.महादेव मंदिरा मेहरूण हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने तो दररोज मेहरूण तलाव येथे मित्रांसोबत रनिंग करण्यासाठी जात असतो. दैनंदिनीप्रमाणे १७ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विकी मुंडोकार हा त्याचा मित्र राधेश्याम नारायण चांदेकर रा. समतानगर, राकेश अरुण पाटील रा. रायसोनी नगर आणि अंकित बाळकृष्ण कापुरे रा. श्याम नगर, शिव कॉलनी असे रनिंग करण्यासाठी मेहरुन तलाव येथे गेले.
तलावाजवळील कृष्णा लॉनच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांनी दुचाक्या लावल्या आणि तेथेच बॅग ठेवून रनिंग करण्यासाठी ट्रॅकवर गेले. काही वेळाने ते परत आले असता अज्ञात चोरट्यांनी तेथे ठेवलेल्या चौघांच्या बॅगा चोरून नेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. चौघांनी परिसरात शोधाशोध केली परंतु कुठेही बँगा आढळून आल्या नाही. यात विकी मुंडोकार याचा १४ हजाराचा मोबाईल आणि राधेश्याम चांदेकर याचे १४ हजाराची रोकड असा एकुण २८ हजाराचा मुद्देमाल लांबविला. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकी मुंडोकार यांच्यासह त्याच्या मित्रांनी धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहे.