जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे पाणी भरण्यासाठी मोटार सुरु केली असताना विजेचा जोरदार झटका लागून महिलेचा मृत्यू झाला. दीपाली चेतन तायडे (वय २५) असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव असून मात्र महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच विवाहितेच्या माहेरच्यानी ग्रामीण रुग्णालयातून विवाहितेचा मृतदेह भादली या तिच्या माहेरीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. अखेर भादली या गावी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केले.

तर दुसरीकडे सासरच्यांनी वांजोळा येथे अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालेली असताना माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने सासरच्यांनी कणकेच्या पिठाची बाहुली करून त्या बाहुलीवर मृत विवाहितेचा फोटो ठेवून अंत्ययात्रा काढत बाहुलीवर अंत्यसंस्कार केले. मृतदेह न मिळाल्याने कणकेच्या बाहुलीवर अंत्यसंस्काराची वेळ विवाहितेच्या सासरच्यांवर आल्याने या प्रकारामुळे ग्रामस्थांचेही डोळे पाणावले होते.

महिलेच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.







