जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रजेवर कारागृहाबाहेर पडून फरार झालेल्या आरोपीला गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरा परिसरातून अटक केली आहे. बारकू बाबूराव कोळपे (वय ३५, रा. तांबापुरा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
धुळे पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात बारकू कोळपे यास धुळे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असताना ५ जून २०२१ रोजी आरोपी कोळपे यास कोराेना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते; मात्र त्यानंतरही मुदतीत आरोपी कारागृहात पुन्हा दाखल झाला नाही. याप्रकरणी एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी १४ रोजी दुपारी २ वाजता तांबापुरातून बारकू कोळपेला सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, नाना तायडे यांनी अटक केली.