गुरूवार, सप्टेंबर 21, 2023

दोन महिलांनी यावलच्या शेतकऱ्याला लावला पावणेसहा लाखाचा चुना.. नेमकं काय घडलं??

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । सध्या फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यात अनेकांना हजारो लाखोंमध्ये गंडविले जात आहे. अशातच यावल तालुक्यातील एका शेतकऱ्याला लाखोंचा चुना लावला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप तयार करीत त्याद्वारे एका योजनेत गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत कांचनकुमार सुधाकर पिंपळे (४७, रा. भालोद, ता. यावल) या शेतकऱ्याची पाच लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एप्रिल २०२३ मध्ये लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला व त्यात भालोद येथील शेतकरी कांचनकुमार पिंपळे यांना समाविष्ट केले. त्यावर दोन क्रमांकाद्वारे एक गुंतवणूक योजना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या योजनेत गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देतो, असे त्यांना सांगण्यात आले.

शेतकऱ्याने विश्वास ठेवून वेळोवेळी त्यांनी सांगितलेलया बँक खात्यात एकुण ५ लाख ६५ हजार रूपये पाठविले. परंतू त्यांना अद्यापपर्यंत कोणताही नफा मिळाला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याबाबत अज्ञात दोन महिलांविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहे.