जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । नशिराबाद ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या कामात अपहार करून व विविध चेक बाउन्सच्या केसमध्ये फरार असलेल्या माजी सरपंचाला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली. कल्याण येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. खिलचंद दगडू रोटे (वय-४१) असे त्याचे नाव आहे.
नशिराबाद येथील माजी सरपंच खिलचंद दगडू रोटे (वय-४१) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशनला अपहाराचा तर विविध पोलीस स्टेशनला चेक अनादरचे १३ गुन्हे दाखल आहेत. चेक अनादरच्या दाखल १३ गुन्ह्यांपैकी ११ गुन्हयांमध्ये तो पोलिसांना पाहिजे होता. गेल्या ४ वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो मिळून येत नव्हता.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना खिलचंद रोटे हा मुंबई परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी नेमलेल्या पथकातील जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, संदीप सावळे यांच्या पथकाने त्याला पकडण्यासाठी मुंबई, कल्याण, ठाणे परिसरात सापळा रचला होता.
कल्याण पश्चिम भागात असलेल्या साई चौकात तो दररोज ये-जा करीत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. एलसीबीने त्याला नशिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.