जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, 14 जून रोजी सायंकाळी घडली होती.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चौधरींविरोधात गुन्हा दाखल आहे. चौधरींनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने सुरूवातीला 22 व नंतर पुन्हा 24 पर्यंत दिलासा होता तर गुरुवारी पुन्हा सरकारी पक्ष व चौधरी यांच्यातर्फे कागदपत्रे सादर झाल्यानंतर आता 30 जून रोजी जामिनावर सुनावणी होणार असल्याचा निर्णय न्या.संजय भन्साली यांनी सुनावला. दरम्यान, 30 जूनपर्यंत चौधरी यांना पुन्हा अंतरीम दिलासा देण्यात आल्याने जामिनावर आता पुढे काय निर्णय होतो? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे सोमवार, 14 रोजी अधिकार्यांसह गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी तेथे आल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष
चौधरी यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर 22 पर्यंत त्यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवार, 22 रोजी न्या.संजय भन्साली यांच्या न्यायासनापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाली. याप्रसंगी बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या ‘से’ मध्ये चौधरी यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांसह मुख्याधिकार्यांविरोधात दाखल गुन्ह्याची माहिती देण्यात आली.
न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपींच्या वकीलाला दाखल गुन्ह्याबाबत म्हणणे मांडण्याचे निर्देश देत 24 जून रोजी सुनावणी ठेवली होती तर गुरुवार, 24 जून रोजी सरकारी पक्षातर्फे तसेच चौधरी यांच्या वकीलांनी न्यायालयात काही कागदपत्रे सादर केली. न्या.भंन्साली यांनी 30 जून जामीन प्रकरणी सुनावणी होणार असल्याचे प्रसंगी जाहीर केले. सरकार पक्षातर्फे अॅड.विजय खडसे तर चौधरी यांच्यातर्फे अॅड.जगदीश कापडे यांनी काम पाहिले.