जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२५ । बोगस कॉल सेंटर प्रकरणी कारागृहात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांचा महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सोबतच त्यांच्या मातोश्री सिंधुताई कोल्हे व चिरंजीव पीयूष कोल्हे यांचेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

एकीकडे जळगाव शहरात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, बोगस कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे कारागृहात आहे. यामुळे ललित कोल्हे निवडणूक लढणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह यांच्या मातोश्री सिंधुताई कोल्हे व चिरंजीव पीयूष कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक ११ क मधून सिंधुताई विजय कोल्हे यांनी तर ११ ड मधून ललित विजय कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तसेच पियुष ललित कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वतीने त्यांचा उमेदवारी भरत असून,न्यायालयाच्या परवानगीने सूचक आणि अनुमोदक हे माजी महापौर ललित कोल्हे यांचा भरणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सरिता कोल्हे यांनी दिली आहे









