गृह विलगीकरणाचे शास्त्रोक्त नियम पाळावे, अन्यथा गंभीर होण्याचा धोका
कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक जण गृह विलगीकरण (होम कोरोनटाईन) चा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र गृह विलगीकरण करताना काय नियम पाळावे याबाबत प्रत्येक नागरिकांनी माहिती जाणून घ्यावी, अन्यथा लक्षणे वाढल्यास प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. योगिता बावस्कर यांनी दिली आहे.
शासनाने सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना गृह विलगीकरण पर्याय उपलब्ध केला आहे. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरात एका खोलीत विलगीकरण करावे. कोणत्याही परिस्थितीत घरातील सर्व, विशेष करून ५० वर्षावरील तसेच मधुमेह, रक्तदाब व अन्य गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्या व्यक्तीपासून वेगळे राहा. ज्या खोलीत रुग्ण राहणार असेल त्या खोलीत हवा मोकळी हवी. खिडकी उघडी हवी. रुग्णाने पूर्ण वेळ तीन पदरी (ट्रिपल लेअर) मास्क वापरावा. हा मास्क आठ तासपर्यंत वापरू शकतात. हा मास्क परत वापरता येत नाही. घरातील दुसऱ्या व्यक्तीसोबत संपर्क येत असेल तर एन ९५ मास्क वापरावा, हा मास्क ४ ते ५ वेळा वापरता येतो, या मास्कला धुवू नये, कोरोनाबाधित व्यक्तींने व्यक्तिगत वस्तूंना घरातील इतर सदस्यांचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. बावस्कर यांनी केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णाने जास्तीत जास्त आराम करावा, पाणी भरपूर प्यावे, सकस आहार, फळे खावी. कोरोनाबाधित रुग्णाने पालथे झोपावे, त्यामुळे ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. घरात पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर असणे गरजेचे आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन व तापमान दर ४ तासांनी मोजावे व त्याची नोंद करून ठेवावी. ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजण्यासाठी हाताच्या मधल्या बोटाला ऑक्सिमीटर लावावे. हे करताना नेलपॉलिश असल्यास काढून टाकावी. स्टँच्युरेशन ९५ वर हवा नाहीतर त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा. तापमान ३८ डिग्री सेल्सियस अथवा १००. ४ च्या वर असल्यास ताप समजावा, अशी महत्वपूर्ण माहिती डॉ. योगिता बावस्कर यांनी दिली आहे.
दिवसातून दोन वेळा “६ मिनिट वॉक टेस्ट” करावी. आधी ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजावे, मग ६ मिनिटे खोलीत चालावे, त्यानंतर परत सॅच्युरेशन मोजावी. जर सॅच्यूरेशन ९४ पेक्षा कमी किंवा आधीच्या नोंदीपेक्षा ३ अंकाने कमी झाले तर डॉक्टरना त्वरित संपर्क करून दवाखान्यात दाखल व्हावे. कोरोना रुग्णाने पूर्वीची औषधे नियमित सुरु ठेवावी. डॉक्टरांच्या निगराणीखाली कोरोनाचे औषधोपचार घ्यावे. श्वास घेण्यास त्रास, सॅच्युरेशन ९४ पेक्षा कमी, छातीत दुखणे, छातीत भारीपणा वाटणं, चक्कर येणे अशी लक्षणे दिसली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित रुग्णालयात दाखल व्हावे, असेही डॉ. बावस्कर यांनी सांगितले.
गृह विलगीकरण कधी संपवावे ?
कोरोनाची लक्षणे सुरु झाल्यावर १० दिवसांनी व मागील ३ दिवसात ताप आला नाही तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने गृह विलगीकरण संपवू शकतो. परत कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.
घरात काळजी घेण्याऱ्या व्यक्तीला सूचना
रुग्णाची काळजी घेत असलेल्या व्यक्तीने तीन पदरी मास्क तसेच बाधित व्यक्तीच्या खोलीत जायचे तर एन ९५ मास्क वापरावा. मास्कच्या समोरील बाजूला हात लावू नये. वारंवार चेहऱ्याला हात लावू नये, हात २० सेकंदांपर्यंत धुवावे. आजारी व्यक्तीला त्याच्याच खोलीत जेवण द्यावे, त्याची भांडी वेगळी असावी. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील सर्व व्यक्तींनी संपर्कात आल्यापासून पाचव्य दिवशी किंवा कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन डॉ. बावस्कर यांनी केले आहे.