⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

जळगावकरांसाठी खुशखबर! “या’ ठिकाणांसाठी जळगाववरुन विमानसेवा होणार सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। विमानतळावर बंद पडलेली विमानसेवा नव्याने सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यात पुणे, गोवा, आणि हैदराबाद येथे विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे जळगावकरांच्या संपर्काला प्रचंड गतीमान पंख लागणार असून यात पुणे येथील बहुप्रतिक्षित सेवा सुरू झाल्यामुळे हजारो प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे. खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही रखडलेली सेवा पुन्हा सुरु होणार आहे.

जळगाव विमानतळावरील नियमीत प्रवासी वाहतूक सेवा ही बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आधी येथून दररोज मुंबई आणि अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू झाली. मात्र काही महिन्यातच ही सेवा बंद झाली होती. सेवा पुन्हा कधी सुरू होणार ? याबाबत अनेकदा विचारणा करण्यात येत असते. यातच, पुण्यासारख्या ठिकाणी दररोज हजारो जळगावकर प्रवास करत असतात. त्यामुळे जळगाव ते पुणे आणि पुणे ते जळगाव अशी विमानसेवा सुरू करण्याची मागणी देखील कधीपासूनच करण्यात येत होती. आता या सर्व मागण्या पूर्ण होणार आहेत.

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सातत्याने केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतीरादित्य सिंदीया यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच, कंपन्यांशी देखील बोलणे सुरू केले. याचाच परिणाम असा की, आता जळगाव विमानतळाचा समावेश उडाण ५.० अंतर्गत रीजनल कनेक्टीव्हिटी स्कीम मध्ये करण्यात आलेला आहे. यात जळगावसह सिंधुदुर्ग, नांदेड आणि अगत्ती या विमानतळांवरून नियमीतपणे विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी उडो एव्हीएशन प्रायव्हेटे लिमिटेड कंपनीच्या फ्लाय-९१ या विमानसेवेला परवानगी प्रदान करण्यात आली आहे.

उडाण ५.० योजनेच्या आरएसी उपक्रमाच्या अंतर्गत जळगाव येथून नियमीतपणे पुणे, हैदराबाद आणि गोवा येथे विमानसेवा सुरू होणार आहे. वर नमूद केल्यानुसार फ्लाय-९१ कंपनीची विमाने ही सेवा प्रदान करणार आहेत. या विमानसेवांमध्ये नियमीत तसेच बिझनेस या दोन्ही क्लासची सुविधा असणारी विमाने उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात, यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायीक व उद्योजकांना मोठी सुविधा मिळणार आहे. सर्व प्रकारच्या चाचण्यांची पूर्तता करून येत्या काही महिन्यांमध्ये या तिन्ही मार्गावरील विमानसेवा सुरू होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातून पुणे येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. यातच भुसावळ व जळगावहून पुणे येथे जाण्यासाठी मोजक्या ट्रेन्स असून त्या तुडुंब भरलेल्या असतात. प्रवाशांना एसटी अथवा खासगी लक्झरी बसेसवर पूर्णपणे अवलंबून रहावे लागते. यामुळे विमान सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे खासगी बस वाहतुकीवरचे अवलंबीत्व हे देखील काही प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे हा मार्ग खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

जळगावहून गोवा येथे नियमित विमानसेवा सुरू होणार असून स्थानिक पर्यटकांना प्रवासाचा गतीमान पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यटनाला गती येणार आहे. तर अलीकडच्या काळात स्थानिक युवक हे मोठ्या संख्येने हैदराबाद येथील आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला असल्याने त्यांना जाण्या व येण्यासाठी विमानसेवा उपयुक्त ठरणार आहे.