तलावरीने केक कापण्याचा ट्रेंड पडला महागात; पाच तरुण गजाआड
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियावर तलवार हातात घेऊन फोटो टाकणे हे तरुणांसाठी सध्या ट्रेंड झाला आहे. मात्र, असा जीवघेणा ट्रेंड करणे तरुणांना महागात पडले आहे. तलवारीने केक कापून फोटो काढल्या प्रकरणी पाच तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील हिरापूर रोड परिसरात यासिननगर भागात राहणाऱ्या पाच तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाढदिवस साजरा करताना केक तलवारीने कापून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे कृत्य या तरुणांनी केले आहे.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोईन अश्पाक खाटीक (वय १९), नाजीम नजोमुद्दीन खाटीक (वय १९), तन्वीर शाकीर खाटीक (वय १८), तरबेज तौकीर खाटीक (वय २४) (सर्व रा. सबस्टेशन जवळ, यासीननगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) तसेच आयान दयान खाटीक (वय २०, रा. त्रिमूर्ती बेकरीसमोर, हुडको कॉलनी) या पाच युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या युवकांकडून दोन तलवारी आणि एक चॉपर अशी हत्यारे देखील आढळून आली आहे. त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्यात सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना केली आहे. या सेलमधील पोलिस कर्मचारी सोशल माध्यमांवर नजर ठेवण्याचे काम करीत असतात. याच सेलच्या माध्यमातून चाळीसगाव पोलिसांनी हत्यारासह फोटो टाकणाऱ्या युवकांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.