जळगावहून पुण्यात येऊन महिलांचे दागिने चोरायचे; पण असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सध्या दिवसेंदिवस वाढ होते आहे. यतात गुन्हा दाखल असलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणातील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी पाच चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपींवर यापूर्वी पुण्यासह जळगाव, अकोला, अमरावती शहरात सोनसाखळी चोरीचे ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
पर्वती (Parvati) दर्शन परिसरात २४ ऑगस्ट रोजी रिक्षातून जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले होते. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विश्रामबाग पोलीस ठाण्यातही अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील आरोपी संगमपूल येथून त्यांच्या गावी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २५), लोकेश मुकुंदा महाजन (वय २४, दोघे रा. दत्तनगर, कात्रज), प्रसाद ऊर्फ परेश संजय महाजन (वय २५), संदीप अरविंद पाटील (वय २८) आणि दीपक रमेश शिरसाठ (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सर्व आरोपी मूळ जळगाव येथील असून, ते पुण्यात येऊन महिलांचे दागिने चोरी करीत होते. आरोपींनी पर्वती, भारती विद्यापीठ , सहकारनगर, बिबवेवाडी आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळ्या चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.