कोचूर खुर्द येथे विजेची तार तुटून पाच बकऱ्यांचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । सावदा (ता. रावेर) येथून जवळच असलेल्या कोचूर खुर्द गावात विजेच्या खांबावरील तार अचानक तुटून चरण्यासाठी जात असलेल्या बकऱ्यांवर पडल्याने यात शाॅक लागून ५ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. दरम्यान, पशुपालकांचे माेठे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
काेचूर खुर्द येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील गौतम तायडे यांच्या मालकीच्या ३० हजार रुपये किमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची सात हजार रुपये किमतीची एक तर संतोष तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची एक अशा अंदाजे ४४ हजार रुपये किमतीच्या पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने सकाळी एकच गोंधळ उडाला होता. सावदा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. येथील पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक देविदास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटविला. यावेळी काेचूर खुर्दच्या पोलिस पाटील मनीषा पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.