नशिराबादमध्ये डेंग्यूचे पाच रुग्ण आढळल्याने खळबळ ; ही विशेष काळजी घेण्याचे आवाहन?

मे 29, 2025 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । जळगाव तालुक्यातील नशिराबादमध्ये एकाच दिवसात डेंग्यूचे पाच रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, संपूर्ण गावात सर्वेक्षण व जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

dengue

प्राथमिक आरोग्य केंद्र,नशिराबाद अंतर्गत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलेल्या रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये बारादरी मोहल्ल्यातील ३, मनियार मोहल्ल्यातील १ व निमगाव भागातील १ अशा पाच रुग्णांमध्ये डेंग्यूची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात व्यापक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. करिश्मा जैन यांच्या नेतृत्वाखाली २३ आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या टीमद्वारे घरोघरी जाऊन पाणी साठ्यांची तपासणी करण्यात आली. तालुका हिवताप पर्यवेक्षक चंद्रशेखर महाजन यांच्यासह डॉ. प्रमोद पांढरे यांनी गावात भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच डॉ. प्रमोद सोनवणे व डॉ. बाळासाहेब वाबळे यांनी रुग्ण आढळलेल्या भागात भेट देत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रमोद अमोदकर यांच्याशी समन्वय साधून जनजागृती वाढवण्याचे आवाहन केले. नगरपंचायतीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले

ही घ्यावी विशेष काळजी
नागरिकांनी आपापल्या घराच्या परिसरात स्वच्छता राखावी, पाणी साठा झाकून ठेवावा, कुलर व फ्रिजमागील पाण्याची स्वच्छता करावी, नारळाच्या करवंट्या, टायर, अडगळीचा साठा टाळावा, संडासाच्या वेंट पाइपला जाळी बसवावी आणि रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment