जळगाव लाईव्ह न्यूज |६ डिसेंबर २०२२ | खवय्ये व मत्स्य अभ्यासक यांच्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात कोंबडा, लालपरी, रोहू, गेर अशा विविध स्थानिक प्रजातींचे मासे आढळून येतात. त्यात आता चिलापी, मांगूर या सारख्या परदेशी प्रजातींचीही भर पडली आहे. मात्र मत्स्यपालन मोहिमेला जळगाव जिल्ह्यात पाहिजे तशी गती मिळालीच नाही. जळगाव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी अनुकूल नैसर्गिक परिस्थिती आणि मुबलक संसाधने उपलब्ध आहेत. या जोडीला जैव विविधताही आहे. या विषयावर चर्चा करण्याचे कारण म्हणजे, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांमध्ये आढणारा ‘स्पॉटेडसेल बार्ब’ मासा जळगावच्या वाघूर धरणात आढळून आला आहे.
आंतरराष्ट्रीय मोहर उमटली
वन्यजीव संरक्षण संस्था अर्थात व्हीजेएसएस ही संस्था राज्यातील जैविक विविधतेच्या संशोधन, संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे ‘शोध गोड्या पाण्यातील माशांचा’ ही विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे ३४ पेक्षा जास्त प्रजातींची नोंद घेतली. यावर्षी महाराष्ट्रासाठी नवीन असलेल्या ‘स्पॉटेडसेल बार्ब’ या माशाचा शोध लावण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणात हा मासा आढळून आला आहे. संस्थेचे मत्स्य अभ्यासक गौरव शिंदे यांच्या पुढाकाराने बाळकृष्ण देवरे आणि कल्पेश तायडे यांच्यासोबत मोहिम राबविली. फेब्रुवारी २०२१ मध्ये जळगांव जिल्ह्यातील वाघूर धरण बॅक वॉटरमध्ये या माशाला शोधून काढले. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये इंडोनेशियाच्या टॅप्रोबॅनिका या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत याचा शोध निबंध शॉर्ट नोट प्रसिद्ध झाला. यामुळे या संशोधनावर अधिकृत मोहर उमटली आहे.
वाळू उपशामुळे माशांचे प्रमाण घटले
गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणामी नदी पात्रातील रेतीचं प्रमाण कमी झाल्याने परिसरातील भूजल पातळीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. यासह विविध प्रकारचे जल किडे, मासे, शंख, शिंपले या उपशामुळे नष्ट झाल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. गिरणा नदीसारख्या गोड्या पाण्यात जलद वाढणार्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या पाण्याचा तळ धरून वाढतात. या जाती एकमेकाला त्रासदायक नाहीत. मात्र आता गिरणा नदीमध्ये आढणारे मासेही आता कमी झाले आहे.
देशी मासे घटले विदेशी प्रजातींमध्ये वाढ
मेहरुण तलावातील पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे माशांच्या स्थानिक प्रजाती झपाट्याने नष्ट होत आहेत. पूर्वी याठिकाणी कोंबडा, लालपरी, रोहू, गेर अशा विविध स्थानिक प्रजातींचे मासे आढळत होते. यातील बहुतांश प्रजातींचे मासे आता आढळून येत नाहीत. तलावातील पाण्याचे प्रदूषण वाढल्यामुळे माशांच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असताना प्रदूषित पाण्यात वाढणार्या परदेशी प्रजाती मात्र, झपाट्याने वाढत आहेत. त्यात चिलापी, मांगूर या प्रजातींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
मत्स्य व्यवसायापुढील समस्या
जळगाव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी अनुकूल नैसर्गिक परिस्थिती आणि मुबलक संसाधने उपलब्ध असली तरी या व्यवसायापुढे काही समस्याही आहेत. शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याकडे दर्जेदार मत्स्यबीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. काही जण इतर राज्यातून मत्स्यबीज खरेदी करतात. मात्र इतर राज्यांतून मत्स्यबीज खरेदी करताना मत्स्य व्यावसायिकांची फसवणूक होते. भेसळयुक्त मत्स्यबीज मिळते. स्थानिक पातळीवर मार्केट उपलब्ध होत नाही. त्यासाठी इतर शहरांतील मार्केटवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वाहतुकीवर मोठा खर्च येतो. याशिवाय माशांसाठी आवश्यक असणार्या खाद्याचे उत्पादन होत नाही. मत्स्यव्यवसाय विकास विभागातर्फे केज कल्चर विकसित करण्यासाठी खास प्रयत्न झाल्याने या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मात्र त्याची योग्य प्रसिध्दी न झाल्याने शेतकर्यांपर्यंत केज कल्चरची पुरेशी माहितीच नाही. मत्स्यव्यवसायाकडे शेतकरी वर्गाने सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायात शेतकर्यांनी उतरले पाहिजे. या व्यवसायाशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.