⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२१ । जिल्ह्यातील भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर येथे उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासत असतानाच जळगाव जिल्ह्यात पहिलाच ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतून उभा राहत असल्याची बाब निश्‍चितच आनंददायी असून जिल्ह्यासाठी दिलासादायक असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की,
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी लागणारा ऑक्सीजन जिल्ह्यातच निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यात दहा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दहा कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत. भुसावळ येथील या प्रकल्पामुळे रुग्णालयातील रूग्णांना पुरेसा ऑक्सीजन मिळणार आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास अजून एक कोटी नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार असून तेही मंजूर करण्यात येईल. शिवाय या रूग्णालयास सुरक्षित भिंत बांधण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तिसर्‍या लाटेसाठीही सज्ज

पालकमंत्री म्हणाले की, याठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरू झाल्याने भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मोहाडी रोडवरील महिला रूग्णालय, धरणगाव, पारोळा, भडगाव, रावेर, अमळनेर या दहा ठिकाणी याच धर्तीवर ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभे राहणार असून भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा सज्ज आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांलयामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला असून ग्रामीण रुग्णालयातील विद्युत प्रश्‍नासाठी 48 लाख रुपये आमदारांच्या सूचनेवरून मंजूर करण्यात आले आहेत. यापुढेही आमदार संजय सावकारे व नगरपालिकेतर्फे जी विकास कामे सुचविली जातील ती पूर्ण करण्यासाठी कटीबध्द राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.

शहर व तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार- आमदार सावकारे

यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात आमदार निधीतून उभारण्यात आलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत लक्षात आले होते की, ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असतो व वारंवार ऑक्सीजन सिलिंडर भरण्यासाठी पाठवावे लागण्याची बाबही खर्चिक आहे. मात्र आता रुग्णालयातील शंभर बेडसाठी एकाचवेळी ऑक्सीजनची सुविधा पुरवता येणे शक्य झाल्याने शहर व तालुक्यातील रुग्णांनाही दिलासा मिळणार आहे.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नागोजीराव चव्हाण, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोंबे, रामकृष्ण कुंभार, नगरसेवक मनोज बियाणी तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, डॉ.नितु पाटील, डॉ.चाकूरकर, डॉ.विक्रांत सोनार आदी उपस्थित होते.

एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार

एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची या प्रकल्पातून निर्मिती होईल. हवेमधून ऑक्सिजन एकत्र करून हा थेट मशीनरीच्या माध्यमातून रुग्णांना पुरविला जाईल. या प्रकल्पामुळे आता बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, त्यामुळे वेळेबरोबरच शासनाच्या निधीची देखील बचत होईल. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.

author avatar
Tushar Bhambare