जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२६ । एकीकडे जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडत असताना शहरातील पिंप्राळा भागामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर हवेत गोळीबार झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र हा गोळीबार राजकीय वादातून नसून वैयक्तिक वादातून झाल्याचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

पिंप्राळा भागातील आनंद मंगल नगर परिसरामध्ये दोन व्यक्तींमध्ये असलेल्या जुन्या वादाचे पर्यावसान भांडणात झाले आणि रागाच्या भरात एकाने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. मात्र हा गोळीबार दोन गटांतील वैयक्तिक वादातून झाला असून, त्याचा महापालिका निवडणूक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केलं असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केलं. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




