जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । विना परवाना सूर्यफूल बियाण्यांची विक्री करणे चांगलीच भोवली आहे. जळगाव महाराष्ट्रात विक्रीस परवाना नसलेल्या सूर्यफुलाच्या बियाण्यांच्या ६७ हजार रुपये किमतीच्या १७ बॅग गुणवत्ता नियंत्रण पथकाने पारोळा येथील कृषी केंद्रातून जप्त केल्या आहे.
महाराष्ट्रात विक्रीचा परवाना नसलेले सूर्यफूल बियाणे विक्री करणाऱ्या जय सेवालाल अॅग्रेा कजगाव नाका, पारोळा येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व पारोळा पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी सापळा रचून ६७ हजार ९८० रुपये किंमतीचे १७ सू्र्यफूल बियाण्याच्या बॅग जप्त केल्या आहे.
याप्रकरणी जय सेवालाल अॅग्रोचे रितेश कैलास पवार (रा. पारोळा) व अॅग्री बी. सन फार्म प्लस हायब्रीट राजकोट गुजरात यांच्याविरुध्द सरकारतर्फे बियाणे अधिनियम १९६८ नुसार पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतरीत्या विनापरवाना सूर्यफूल बियाणे विना बिलाने शेतकऱ्यांनी खरेदी करु नये. अशा विना परवाना सूर्यफूल बियाण्याची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.