जळगाव मनपातील ‘ते’ नगरसेवक चिंतेत!
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । शहराच्या विकासासाठी सध्या उपलब्ध असलेला निधी पुरेसा नसून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणखी निधी मागून घ्यावा. पुढील अडीच वर्षात शहराचा विकास न झाल्यास नागरिकांसमोर तोंड दाखवता येणार नाही अशी चिंता २७ बंडखोर नगरसेवकांनी व्यक्त केली.
जळगाव जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ बंडखोर नगरसेवकांची बैठक आज दुपारी अजिंठा विश्रामगृह येथे घेतली. यावेळी बंडखोर नगरसेवकांनी आपण निवडून येण्याची चिंता व्यक्त करत जळगाव शहराच्या विकासासाठी अधिकचा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागवून घ्यावा अशी विनंती संजय सावंत यांच्याकडे केली.
अमृत योजना भुयारी गटार योजनेमुळे जळगाव शहराची दयनीय अवस्था झाली आहे. यात शिवसेनेची महापालिकेवर सत्ता येऊन पाच महिने उलटूनही शहराचा हवा तेवढा विकास झाला नाहीये. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या ६२ कोटीच्या निधीतून जळगाव शहराचा विकास होणार नाही. यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकचा निधी मागवून घ्यावा. जेणेकरून जळगाव शहराचा विकास करता येईल व निवडणुकीवेळी नागरिकांना तोंड दाखवता येईल, असे यावेळी बंडखोर नगरसेवक संजय सावंत यांना म्हणाले.
राज्यात कोरोनाचे संकट असल्याने आपण सर्व त्याविरुध्द लढा देत आहोत. कोरोनामुळे सध्या कोणत्या जिल्ह्याला निधी दिला जात नसून जळगाव हा देखील महाराष्ट्राचाच भाग आहे. योग्य वेळ आल्यावर निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया संजय सावंत यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.